उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण
Ekach Dheya
उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकता
सर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणी
अंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे : उपराष्ट्रपती
भारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या क्रांतीकारकांचे स्मरण केले. फेसबुक पोस्टमध्ये उपराष्ट्रपती नायडू म्हणतात, आपल्या प्रतिकांचा उत्सव करणे स्वाभाविक आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांमध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आपापल्या प्रांतात लोकप्रिय होते आणि त्यांच्या असंख्य पराक्रमांमुळेच ब्रिटीशांना सोडून जावे लागले.
त्यांनी भर देऊन सांगितले की, ते केवळ ठराविक प्रदेशापुरतेच मर्यादीत नाहीत, तर ते ‘राष्ट्रीय हिरो’ आहेत, ज्यांचे शौर्य आणि बलिदान देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजे. राष्ट्राने सदैव या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले पाहिजे, त्यांच्या निःस्वार्थी प्रयत्नांमुळेच आपण आज सार्वभौम आणि संसदीय लोकशाहीचे नागरीक आहोत.
उपराष्ट्रपती म्हणाले, लोकांना विशेषतः युवकांना अशा क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यांनी सल्ला दिला की, राज्यांनी शौर्य आणि बलिदानाच्या कथा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रकाशित कराव्या आणि त्यांचा वारसा जिवंत ठेवावा. ‘त्याचवेळी आपण त्यांना न्याय देऊ आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करु- खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत, श्रेष्ठ भारत आणि सशक्त भारत’, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
ते म्हणाले, टाळेबंदीमुळे या महान नेत्यांचे आयुष्य आणि कार्य याबद्दलच्या पुस्तकांचे वाचन करण्यास आणि ज्ञानार्जन करण्यास भरपूर वेळ मिळाला आहे.
उपराष्ट्रपती म्हणाले, ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे भारताचा विकास खुंटला, अनेक बाबी खराब केल्या आणि संस्कृतीची पिछेहाट झाली. गतवैभवाच्या खुणा ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे नाहीशा झाल्या, म्हणून उपराष्ट्रपतींनी सांस्कृतिक पुनरुत्थानाची गरज व्यक्त केली आणि साहित्य आणि कला आपल्या राष्ट्रीय भाषांमध्ये गुंफण्याची मागणी केली.
त्यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत गतवैभव प्राप्त करेल आणि 130 कोटी नागरिकांची इच्छाशक्ती आणि प्रचंड ऊर्जेच्या जोरावर आदर्श संसदीय लोकशाही ठरेल. ते म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रातील भारतीयाने कर्तव्यपूर्ती करावी, ज्यामुळे भारत विकास आणि भरभराटीची नवी उंची गाठेल.
भारताच्या प्रगतीतील काही महत्त्वाच्या टप्प्यांविषयी सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले, गेल्या पाच वर्षांत, भारतात पायाभूत सुविधांचे प्रचंड आधुनिकीकरण झाले आहे आणि सामाजिक सुरक्षेचे जाळे मजबूत झाले आहे. ते म्हणाले देशात सध्या वीज नसलेले कोणतेही गाव नाही तसेच उघड्यावर शौचापासून मुक्त आहे. विविध क्षेत्रांतील विशेषतः कृषी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण निर्णयांमुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या कर सुधारणांचे नायडूंनी कौतुक केले.
आतापर्यंत देशाने केलेली प्रगती लक्षात घेऊन, तटस्थपणे आत्मनिरीक्षण करावे, 2022 पर्यंत आपण राष्ट्र म्हणून काय साध्य करु इच्छितो, याची प्रत्येकाने विचारणा करावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘संकल्प से सिद्धी’ ही घोषणा आपल्या विचारसरणीत मुलभूत बदल करण्याविषयी आहे, 2022-23 पर्यंत नवभारत निर्मितीसाठी आपण कसा विचार करतो, कसे वागतो आणि कृत्य करतो यासंबंधी आहे, असे सांगितले.
2022 चे ध्येय स्पष्ट करताना, ज्यावेळी भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, नायडू म्हणाले, भारतात कोणीही बेघर असता कामा नये. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, स्वच्छ अन्न आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मिळाली पाहिजे. ते म्हणाले, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
उपराष्ट्रपती नायडू यांनी लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लक्षात घेण्यासाठी युवकांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यावर नव्याने भर देण्यास सांगितले. ते म्हणाले आपण जोमाने कार्य करुन दारिद्र्यनिर्मुलन, सामाजिक आणि लिंगभेद आणि भ्रष्टाचार निर्मुलन केले पाहिजे.
आपण वंचित घटकांचे यात दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरीक आणि तृतीयपंथी यांना सुरक्षित, उत्पादनक्षम, लाभदायी, समृद्ध आणि शांततापूर्ण जीवन सुनिश्चित केले पाहिजे, असे म्हणाले.
अंत्योदय आणि सर्वोदय हेच आपल्या मार्गक्रमणाचे मुख्य तत्व असले पाहिजे, आणि 2022 पर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.