पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन सर्वांनी उत्साहात पार पाडावा, अशी सूचना डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचे नियोजनाची पूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकरी (माध्यमिक) डॉ.गणपत मोरे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले की, विधानभवनाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम ( विद्युत) विभाग, शिक्षण विभाग, उद्याने व उपवने तसेच नियोजनाची जबाबदारी असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडून कार्यक्रम उत्साहात पार पाडावा. यावेळी विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेऊन उपस्थितांना आवश्यक सूचना केल्या
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाच्या अनघा पुराणिक, शाखा अभियंता आर.एम.मुखेकर, उपवने व उद्याने विभागाचे एस.टी.जाधव,भ.ब.गायकवाड,पुणे महानगर पालिकेचे कामगार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते.