Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पर्यटन मंत्रालयाद्वारा आयोजित, स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित वेबिनार सिरीजचा, ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’ या सत्राने समारोप

नवी दिल्‍ली : “देखो अपना देश’ या अभियानाअंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय वेबिनार आयोजित केले होते. 15 ऑगस्ट 2020 रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’ या विषयावरील सत्राने या वेबिनारचा समारोप झाला.

देशात सध्या कोरोना या जागतिक साथीच्या आजाराने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पर्यटन मंत्रालयाने, यावर्षी, 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला अभिवादन करण्यासाठी वेब माध्यमाची निवड केली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याअंतर्गत पाच वेबिनार आयोजित केले होते. भारताचा स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यलढयाशी संबंधित ऐतिहासिक महत्वाच्या जागा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती, अशा, विविध विषयांचा परामर्श या वेबिनार शृंखलेत घेण्यात आला.

वेबिनारमध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजीचे सत्र, सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाला समर्पित होते. या वेबिनारच्या सुरुवातीला, गुजरात सरकारचे पर्यटन आयुक्त आणि गुजरात पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जेनु दिवाण यांनी  गुजरातमधील सरदार पटेलांशी सबंधित स्थळांचा परिचय करून दिला.

या वेबिनार मध्ये सरदार पटेल यांच्या आयुष्याशी सबंधित अनेक घटनांना उजाळा देण्यात आला. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण, वकिली शिकण्याकरीता लंडनला जाणे, बॅरीस्टर म्हणून कारकीर्द, 1916 साली बॅरीस्टर क्लब येथे महात्मा गांधींशी झालेली भेट, अहमदाबाद महापालिकेच्या अध्यक्षपदासाठी 1922, 1924, आणि 1927 साली झालेली निवड, अहमदाबादच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सुधारणा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात  केलेले मदतकार्य आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाशी तडजोड न करणारे, उच्च मूल्यांवर आजन्म वाटचाल करणारे त्यांचे व्यक्तीमत्व, या सर्व गोष्टींना या वेबिनारमध्ये उजाळा देण्यात आला.

या वेबिनारमध्ये सरदार पटेलांशी संबंधित गावाचा मागोवा घेण्यात आला.  यात, नाडीयाद हे त्यांचे जन्मगाव, जिथे त्यांचे शिक्षण झाले, पेटलाड, बोरसाड, गोधरा आणि कर्मासाद या गावांचा समावेश होता.

या वेबिनारमध्ये आपले अनुभव सांगण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यपूर्व काळ अनुभवलेल्या अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. यात माजी आयपीएस अधिकारी आणि राष्ट्रीय पोलीस अकाडमीचे माजी संचालक पद्म रोषा यांचाही समावेश होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया नॅशनल आर्मीमधल्या राणी झाशी  रेजिमेंटच्या माजी सेकंड लेफ्टनंट 94 वर्षे वयाच्या, रमा खांडवाला देखील या वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या. सरदार पटेल यांच्याशी मुंबईत झालेल्या भेटीच्या आठवणीना त्यांनी यावेळी उजाळा दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, परिचारिका म्हणून केलेले काम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी आलेल्या संपर्कामुळे त्यांचे आयुष्य कसे आमूलाग्र बदलून गेले, याची माहिती, खांडवाला यांनी दिली.

आपल्या या वीर, निर्भय स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेचा आपण आजही आणि पुढेही, एकतेची ताकद ओळखायला हवी, असा संदेश देत, या वेबिनारचा समारोप झाला.

“देखो अपना देश’ ही वेबिनार शृंखला केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाने प्रस्तुत केली  होती.  या वेबिनारची सत्रे  https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured

यावर उपलब्ध आहेत. तसेच पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल मिडीया हँडलवर देखील बघता येतील.

हैदराबाद या शीर्षकाचे पुढचे वेबिनार येत्या 22 ऑगस्टला सकाळी 11 वाजता होणार आहे.

Exit mobile version