Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आपली वैद्यकीय यंत्रणा ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि भारत हा विश्वासार्ह जोडीदार असल्याचे जगाच्या दृष्टीपथास आले : पियुष गोयल

तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या आरोग्य यंत्रणेला तपासणी, सजगता आणि उपलब्धता या आघाडीवर बळकटी आणण्याचे गोयल यांचे आवाहन‌

नवी दिल्‍ली : आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरली असून  जागतिक सहकार्य आणि व्यापार या आघाड्यांवर भारत हा विश्वासार्ह जोडीदार होऊ शकतो हे जगाच्या दृष्टीस  पडले आहे, असे प्रतिपादन  व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले.  ते CII च्या बाराव्या वैद्यकीय-तंत्रज्ञान जागतिक शिखर परिषदेत आज बोलत होते. ते म्हणाले, भारताला तसेच जगाला आवश्यक औषधपुरवठा होईल ही खात्री देण्यासाठी औषध शास्त्र उद्योग सातत्याने प्रयत्नशील राहिला. “covid-19 शी लढा देण्यासाठी आवश्यक असलेली उत्पादने निर्माण करण्यासाठी म्हणून वैद्यकीय उपकरण व्यवसायानेही श्रम घेतले व आम्हाला मदत केली. सामान्य माणसाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहून त्याद्वारे भारताची सुरक्षितता व कल्याण यांच्या प्रति निष्ठा दाखवून आमचे डॉक्टर्स आणि आरोग्य केंद्रे ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरले.”

कडक लॉकडाऊन म्हणजे काय आणि वेगवान रोगमुक्ती कशी असते हे जगाला भारताने दाखवून दिले असे आज आपण अभिमानाने म्हणू शकतो, असे गोयल म्हणाले. “covid-19 रोगमुक्तीचे  आपले आकडे हे धीर वाढवणारे आहेत, रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांहून जास्त आहे. या कालखंडाने आपल्याला मोलाचे शिक्षण दिले.”

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना स्पष्ट केली होती   तसेच उत्तम कामगिरी केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्राचे विशेष कौतुक केले होते, याचा उल्लेख करत गोयल म्हणाले की तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली आरोग्य यंत्रणा तपासणी, सजगता आणि उपलब्धता अश्या अनेक आघाड्यांवर बळकट करण्याची हीच वेळ आहे. नागरिकांच्या जीवनाचा  प्रश्न येतो तेव्हा आत्मनिर्भर होणे महत्त्वाचे असते याची जाण घेऊन औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यक व्यवसायिक यांनी ही विकासाची वाट चोखाळणे आवश्यक आहे, असे गोयल म्हणाले.

“सातत्यामुळे यशाची खात्री पटते.” असे सांगणाऱ्या परमहंस योगानंद यांचा उल्लेख करत वैद्यकिय व्यावसायिक व औषध निर्माण व्यवसायिक यांची सातत्य व निष्ठा तसेच आत्मनिर्भर भारत प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी घेतलेली मेहनत याचे त्यांनी कौतुक केले.

गोयल यांनी सांगीतले की लोकसंघटन, माहितीचा वापर आणि त्या माहितीचे विश्लेषण त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्य यंत्रणा अजून सुधारण्यास तसेच संबंधित रुग्णाची माहिती अखंडितपणे मिळण्याचा विश्वास उत्पन्न करण्यास मदत करेल. “याचा वापर आपल्या वैद्यकीय व्यावसायिकांना करता येईल आणि अचूक रोगनिदान आणि नेमकी काळजी घेणे यासाठी त्याचा उपयोग होईल.”, असे ते म्हणाले.

जगाची औषधांची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्यासोबतच भारत जगाचे रुग्णालयही बनू शकतो. उर्वरीत जगाला सुविधा, उच्च दर्जाची वैद्यकीय तयारी  आणि जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाहीत असे  उत्तम उपचार  भारतात मिळू शकतील.  भारतात वैद्यकीय तंत्रज्ञान उपकरणे हा व्यवसाय नेहमीच आघाडीवर राहिला आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताने विश्वासाचे स्थान पटकावले आहे तसेच रुग्णालयांनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली जागतिक मोहोर उमटवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने आरोग्य केंद्रे हा अजून एक महत्त्वाचा विषय आहे.  वेलनेस सेंटर मधून दिली जाणारी  प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ही या पुढची पावले आहेत, असं ते म्हणाले. ‘आरोग्यपूर्ण रहाणी’ हा आमच्या सरकारचा मंत्र आहे असेही गोयल यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी भविष्याचे सोनेरी स्वप्न बाळगले आहे. ज्यामध्ये देशातील आरोग्य यंत्रणेचा विकास अंतर्भूत आहे. या भविष्याकडे पावले टाकत भारतात उत्तम दर्जाची आरोग्ययंत्रणा, उपकरणे आणि सुविधा सर्व भारतीयांना उपलब्ध होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

Exit mobile version