लोकराज्यच्या ‘मिशन बिगिन अगेन’ या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
Ekach Dheya
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्यच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी केले.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माजी राज्यमंत्री, आमदार दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, माहिती संचालक सुरेश वांदिले उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्याच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या लोकराज्य मासिकाच्या अंकामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईप्रमाणे इतर ठिकाणी केल्या जात असलेल्या उपाययोजना, मिशन बिगीन अंतर्गत सुरू करण्यात येत असलेले उपक्रम, त्या माध्यमातून राज्यातील अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न, लॉकडाऊनच्या कालावधीत सुमारे एक कोटी 15 लाख गरजूंना दिलेला शिव भोजनाचा लाभ, पोलिसांचा धारावी पॅटर्न आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश आहे. तर ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांनी गेल्या आठ महिन्यांमध्ये घेतलेले निर्णय, केलेली विकासकामे व राबवलेले लोकहिताचे उपक्रम याची माहिती देण्यात आलेली आहे.