Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या विविध उपक्रमांचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत  एनआयओएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला  शालेय शिक्षण आणि  साक्षरता विभागाच्या सचिव  अनिता करवाल, शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव  स्वीटी चांगसन आणि एनआयओएसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान  पोखरियाल  यांनी संस्थेच्या पारदर्शक कामकाजावर  भर दिला जेणेकरून त्याचे उत्तम परिणाम दिसतील. त्यांनी  परीक्षा यंत्रणा बळकट करण्यावरही चर्चा केली. ते म्हणाले की, जर आम्हाला संस्थेमध्ये काही अनियमितता आढळली तर दोषीविरुद्ध  कठोर कारवाई केली जाईल.  त्यांनी एनआयओएस अधिकाऱ्यांना निर्देश दिले की एनआयओएस परीक्षा केंद्रांबाबत तुमच्याकडे काही तक्रारी आल्या तर तुम्ही शक्य तितक्या  लवकर तक्रारींचे निवारण करा. प्रतिष्ठित संस्थेच्या अखंडतेवर कुणीही  प्रश्नचिन्ह निर्माण करू नये म्हणून त्यांनी एनआयओएस अधिकाऱ्यांना परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्र्यांनी एक डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना केली ज्यात देशभरातील सर्व केंद्रांची तपशीलवार माहिती आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यात सर्व हितधारकांकडील माहिती आणि सूचना असतील जेणेकरून प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढेल.

शिक्षणमंत्री म्हणाले की एनआयओएस ही जगातील सर्वात मोठी मुक्त शालेय शिक्षण प्रणाली आहे आणि तळागाळापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी  आपण त्याचा अधिक प्रभावीपणे वापर केला पाहिजे. ते म्हणाले की आपल्या देशातील अशिक्षित लोकांना साक्षर करण्यासाठी आपण देखील त्याचे जाळे उपयोगात आणायला  हवे. यासंदर्भातील संभाव्यतेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक पथक स्थापन  करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Exit mobile version