मुंबई : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुण्यातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टअंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात येत आहे. यासाठी नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोधणी येथे स.क्र.348 मधील 20 एकर जागा 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.