Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 साठी नामांकने आमंत्रित केली

नवी दिल्‍ली : महिला व बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार- 2021 साठी मुले, व्यक्ती व संस्थांकडून नामांकन अर्ज मागविले आहेत. देशातील गुणवंत मुले, व्यक्ती व संस्था यांचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. हे पुरस्कार बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार या दोन विभागांतर्गत देण्यात येतात.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक आठवडा आधी राष्ट्रपतींच्या हस्ते, राष्ट्रपती भवन येथील दरबार हॉलमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. भारताचे माननीय पंतप्रधान देखील पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतात. बाल शक्ती पुरस्कार विजेते, 26 जानेवारी रोजी राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनात देखील सहभागी होतात.

नवोन्मेष, शैक्षणिक, क्रीडा, कला, संस्कृती, समाज सेवा आणि शौर्य अशा विविध क्षेत्रात विलक्षण यश मिळवलेल्या मुलांना सन्मानित करणे हे बालशक्ती पुरस्कारांचे उद्दीष्ट आहे तर बालविकास, बाल संरक्षण आणि बाल कल्याण या क्षेत्रात मुलांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी बाल कल्याण पुरस्कार दिला जातो.

यासंबंधीची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे पुरस्कारांसाठी खास सुरु करण्यात आलेल्या www.nca-wcd.nic.in या  पोर्टल / वेबसाइटवर पाहता येतील. अर्जदारांनी केलेले ऑनलाइन अर्जच ग्राह्य धरले जातील.  अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही. पोर्टल हाताळताना कोणतीही अडचण आल्यास ते तात्काळ मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देता  येऊ शकते. यावर्षी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2020 करण्यात आली आहे.

आयसीसीडब्ल्यूच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांच्या नावाने खासगी संस्थेकडून देण्यात आलेल्या काही पुरस्कारांना मंत्रालयाची मान्यता नाही. आणि या पुरस्कारांशी मंत्रालयाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही हे महिला व बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version