कोल्हापूरातील सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढविण्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सूचना
Ekach Dheya
कोल्हापूर : कोविड केअर सेंटरमध्ये गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अत्यवस्थ झाल्यास, अशा रुग्णांना सीपीआरमध्ये बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या, उपलब्ध बेड, खासगी हॉस्पिटल आणि करण्यात येत असलेले उपचार या बाबतचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री म्हणाले, गेले पाच महिने शासन व प्रशासन कोरोना साथीशी लढा देत आहे. कोरोना रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी कोविड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात सुरु केले आहे. कोविड केअर सेंटरवर उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य असतात. या सेंटरवरील कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अशा रुग्णास सीपीआरकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. अशा रुग्णास बेड उपलब्ध व्हावा यासाठी सीपीआरमध्ये बेडची संख्या वाढविण्यास प्राधान्य द्यावे.
श्री.मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याने नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी प्रशासनाने नॉन कोविड रुग्णांवरील उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करावी. कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन चांगले काम करत आहे. प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन ते शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतले जातील. वाढती रुग्ण संख्या विचारात घेता लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावीत. रेमडिसीव्हीर आणि पीपीई कीट याबाबतचा आढावाही ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यांनी घेतला.
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारांशी चर्चा करुन पुरवठा सुरळीत ठेवावा. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बेड वाढविण्याबरोबर खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी सूचना देण्यात यावी, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयामध्ये यापूर्वी असलेले बेड व नंतर वाढविण्यात आलेले बेड याबाबतचा आढावा घ्यावा.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, डिस्चार्ज झालेले रुग्ण, जिल्ह्यातील उपलब्ध बेड, खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेड याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी सीपीआरमध्ये आणि इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात बेड वाढविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यास दररोज किमान 10 केएल ऑक्सिजनचा पुरवठा पुणे येथून व्हावा अशी मागणी त्यांनी केली.