पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं परिपत्रक सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला.
परीक्षा घेतल्याशिवाय राज्यं किंवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकत नाहीत, विद्यापीठ अनुदान आयोगानं ठरवलेल्या मुदतीत परीक्षा घेणं शक्य नसेल, तर त्यांनी आयोगाशी विचारविविमय करुन परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात, असं न्यायालयानं म्हटलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
न्यायालयाच्या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. या मुद्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणासोबतही चर्चा करू, असं ते म्हणाले