नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुर, चंद्रपुर, भंडारा आदी जिल्ह्यात यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं तैनात आहेत.
पुण्याहून एनडीआरएफची आणखी चार पथकं विषेश विमानानी दाखल झाली असून, नागपूर भंडारा मार्ग बंद असल्यानं ही पथकं नागपूर-भिवापूर मार्गे भंडारा जिल्ह्यातल्या पवनी इथं दाखल होत आहेत.
मध्यप्रदेश आणि विदर्भात गुरुवारपासून होत असलेल्या पावसामुळे तसंच चौराई, पेंच आणि बिना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कन्हानसह नागपुर जिल्ह्यातच्या पेंच, कोलार, जाम आणि वर्धा या प्रमूख नद्याना पूर आला आहे, तर सावनेर, कामठी, कन्हान आणि मौदा या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू आहे. नवेगांव खैरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडून 6 हजार 839 क्युमेक्स आणि तोतलाडोह प्रकल्पाच्या 14 दरवाजे उघडून 6 हजार 693 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचावकार्य करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आल्यानं भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसिखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 4 मीटरनं, तर बावनथळी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्द धरणातून २३ हजार २८९ क्युमेक्स पाणी विसर्ग होत आहे.
वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं पुराचे पाणी पिंपळगाव, चिखलगावसह अनेक गावात शिरले असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. नद्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्यानं भंडारा-नागपूर, भंडारा-तुमसर, भंडारा-बालाघाट, भंडारा-गोंदिया मार्ग बंद झाला आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. भंडारा जिल्ह्याचा पूर परिस्थिती कडे बघता लगतच्या गोंदिया जिल्ह्यातही सतर्कता बाळगली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर आला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांसह १० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पाण्यामुळे वैनगंगा, प्राणहिता या मोठ्या नद्यांसह सती, कठाणी, गाढवी आणि अन्य नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. सोबतच आज चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाचे ३८ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ३८ हजार ८७८ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणातील जलसाठा वाढला आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या अपर वर्धा धरणाचे 13 दरवाजे, बघाजी धरणाचे 31 दरवाजे आणि इतर 6 धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कौंडण्यपुर मधुन वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले असल्यानं अमरावती -आर्वी मार्ग बंद करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्री काही ठिकाणी पाऊस झाला. आज ढगाळ वातावरण आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले आहे. त्यातून १ लाख ४३ हजार ५७५ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
नाशिकमधे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे कालपासून गंगापूर धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण सध्या 97 टक्के इतकं भरलं आहे.
नांदेड आणि जालना जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी पाऊस झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरु आहे, तर सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, मुंबई, नवी मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात सध्या 100 पूर्णांक 38 शतांश टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या धरणातून कोयना नदीत विसर्ग बंद आहे.