नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मानिर्भर बनवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे केले. देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून घ्यायला हवा असेही मोदी म्हणाले.
आत्मनिर्भर भारत अॅप संदर्भात देशातल्या युवकांनी मोठा उत्साह दाखवला असून, त्यामध्ये भर घालण्यासंबंधी आलेल्या ७ हजार सूचनांमध्ये दोन तृतीयांश छोट्या शहरातल्या युवकांच्या आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. आत्मनिर्भर भारत अभियानात ऑनलाईन खेळ आणि खेळणी क्षेत्रात खूप संधी असून, स्टार्ट अप कंपन्यांनी एकत्रित काम करून या क्षेत्रात देशाला महत्वाचे स्थान प्राप्त करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना संकट काळात देशातल्या शेतक-यांनी केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. यंदा खरीप हंगामांतल्या लागवडित गेल्या वर्षीपेक्षा ३ ते १३ टक्के अधिक वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ‘भारतीय कृषी कोष’ निर्माण होत असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातलं पीक आणि त्याचं पोषणमूल्य यांची माहिती मिळणार आहे. सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
पाच सप्टेंबरला असलेल्या शिक्षक दिनाचा उल्लेख करून मोदी यांनी शिक्षक वर्गाने कोरोना काळातल्या आव्हानांना संधीत रूपांतरित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.