Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन

नवी दिल्ली : देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते. ते ८४ वर्षाचे होते. मुखर्जी यांच्या निधनानं ५ दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाला आहे.  २०१२ ते २०१७ या कालावधी प्रणव मुखर्जी हे भारताचे राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते.

प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी बंगालमधील मिरीती इथं झाला. प्रणव मुखर्जी यांचे पिता कामदा मुखर्जी हे स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. तसंच पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणव मुखर्जी यांनी इतिहास, राज्यशास्त्र तसंच कायद्याचा अभ्यास केला होता. १९६३ साली प्रणव मुखर्जी यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला, त्यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. १९६९ साली मुखर्जी यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस पक्षातर्फे ते राज्यसभेवर निवडून आले.

दरम्यान १९८६ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी स्वतःचा छोटा पक्ष स्थापन केला होता, मात्र १९८९ साली त्यांनी पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला. २००४ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेचे सदस्य झाले. २०१२ पर्यंत त्यांनी मंत्रीमंडंळात विविध  पदांवर काम केलं . मुखर्जी यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण तसंच वित्तमंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याचं मंत्री पद भूषवलं होतं. अफ्रिकनं विकास बँक, एशियन डेवलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, तसंच वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळातही काम केलं होतं.

२००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. २०१२ मध्ये ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. गेल्यावर्षीचं त्यांना देशाच्या सर्वोच्च मानाच्या भारतरत्न पुरस्कारानं  गौरवण्यात आलं होतं. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रासह  बियोन्ड सरवायवल,  इमरजिंन डायमेंन्शन्स ऑफ इंडियन इकोनोमी तसंच चॅलेजेस बिफोर द  नेशन ही पुस्तक खूप गाजली.

राष्ट्रपती राजनाथ कोविद यांनी मुखर्जी यांच्या निधानानंतर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. देशानं आज एक सुपुत्र गमावला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत मुखर्जी यांनी देशाच्या विकासात आपला अमिट ठसा उमटवला तसंच ते एक विद्वान विचार वंत होते, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही मुखर्जी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. देशात सर्वच स्तरातून मुखर्जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

देशात सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Exit mobile version