माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, तसंच तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख यांच्यासह अनेकांनी आज सकाळी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि हर्षवर्धन, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांनीही मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दोन मिनीट शांतता पाळून मंत्रिमंडळानं त्यांना आदरांजली वाहिली. एक प्रभावी नेतृत्व आणि प्रतिभावान संसदपटूला देश मुकला आहे, असं मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या शोक प्रस्तावात म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं मुखर्जी यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.