नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात पोलीस दलानं खूप चांगलं काम केलं आहे. पोलिसांनी या आजाराबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केलं. गाणी गाऊन त्याद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. गरीबांना अन्न दिलं. खाकी वर्दीचा मानवी चेहरा या वेळी दिसून आला. याची ताकद खूप मोठी असते, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. हैद्राबाद इथल्या पोलीस प्रशिक्षण अकादमीतील नवीन तुकडीच्या दीक्षान्त संचलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या कामगिरीमुळ पोलीस दलाची मान उंचावली आहे, असंही मोदी यांनी नमूद केलं. आपल्या देशात समाजाची ताकद सर्वात मोठी आहे. समाजाची सक्रीयता हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आजचे आयुष्य खूप धकाधकीचं आहे. योग आणि प्राणायाम यामुळं तणाव दूर होतो. प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून, यशस्वी होण्यासाठी आपल्या सुरवातीच्या काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करा, तसंच नेतृत्त्व विकसित करायचे असेल तर अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही मोदी यांनी नवीन अधिकाऱ्यांना दिला.
जम्मू-काश्मीरमधील दह्शतवाद आणि तरुण यांचा संदर्भ देत, तरुण पिढी वाईट मार्गाला लागण्यापूर्वी त्यांना वेळीच रोखण्याचे काम महिला पोलीस अधिकारी चांगल्या प्रकारे करू शकतात. यामध्ये त्या महिलांना सहभागी करून घेऊ शकतात, असंही पंतप्रधान म्हणाले. आजच्या पोलिसांसाठी तंत्रज्ञान हे नवीन शस्त्र आहे. तंत्रज्ञान हे उपयुक्त आहेच तसचं ते संकटही निर्माण करू शकते, असंही त्यांनी नमूद केलं. सरदार वल्लभभाई पटेल अकादमीतून 131 पोलीस अधिकाऱ्यानी दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यात 26 महिला अधिकारी आहेत. या तुकडीच्या दीक्षांत संचालनाचे नेतृत्त्व तमिळनाडूच्या किरण श्रुती यांनी केलं. या तुकडीतील 15 अधिकाऱ्यांची उत्तरप्रदेशमध्ये तर 11 जणांची तेलंगणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, असं अकादमीच्या संचालकांनी सांगितलं.