मुंबई (वृत्तसंस्था) : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातल्या कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची काल ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार परिक्षा प्रक्रिया येत्या १५ तारखेपासून सुरू करून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा झाली.
समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेऊन दोन दिवसात शासनाला कळवावा तसंच राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुढचं शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासंदर्भात तयारी करावी. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रियाही वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचं सुद्धा नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.