Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बोस्निया, हर्झगोव्हिना देशाशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र इच्छुक – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

बोस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या भारतातील राजदूतांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट

मुंबई : कला, संस्कृती, पर्यटन, उद्योग, उच्च शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन आदी क्षेत्रात बोस्निया आणि हर्झगोव्हिना देशाबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र इच्छुक आहे, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी राजदूत मुहम्मद सेन्जिक यांना सांगितले.

बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचे भारतातील राजदूत श्री. सेन्जिक आणि मुंबईतील मानद वाणिज्यदूत सुहास मंत्री यांनी श्री. रावल यांची त्यांच्या मंत्रालयीन दालनात भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल उपस्थित होत्या.

भारत आणि बोस्निया व हर्झगोव्हिनाचे सांस्कृतिकदृष्ट्या खूप जुने संबंध असून अनेक बाबतीत साम्यस्थळेही असल्याचे यावेळी श्री. रावल यांनी सांगितले. दोन्ही देशात माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया आदी क्षेत्रात गुंतवणुकीस व द्विपक्षीय व्यापारास मोठा वाव असल्याचे सांगण्यात आले. भारतातील वैद्यकीय पर्यटनाच्या संधी, बॉलिवूड पर्यटन याबाबतही श्री. सेन्जिक यांना सांगण्यात आले.

राज्यातील अनेक पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असून दोन्ही देशात पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. रावल यांनी सांगितले. बोस्नियातील युवकांना येथील संस्कृतीची माहिती देण्यासाठी सांस्कृतिक आदान-प्रदानाचा कार्यक्रम राबविण्यात यावा. युवकांना मुंबईत बोलावून बॉलिवूड चित्रपट कलावंतांची भेट घडवून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच तेथील महत्त्वाचे पत्रकार, कला, संस्कृती, उद्योग आदी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे महाराष्ट्रात भेटीचे दौरे आखावेत, असेही श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

दोन्ही देशातील संबंध विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याद्वारे अधिक दृढ करण्यासाठी इच्छुक असल्याचेही श्री. सेन्जिक यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना राज्यातील पर्यटनस्थळविषयक माहितीच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. श्री. रावल आणि श्री. सेन्जिक यांनी परस्परांना स्मृतीचिन्ह भेट दिले.

Exit mobile version