Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख

बियोंड मेडीसिन : ए टू ई फॉर मेडिकल प्रोफेशनल पुस्तकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपल्यामधला आविर्भाव, दुसऱ्यांबरोबर वागण्याची पद्धत, संवाद, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधले नाते आणि नीतिमूल्य यांची नितांत आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

देशातील सर्व वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच सर्व जनतेसाठी उपयुक्त पुस्तक बियोंड मेडीसिन : ए टू ई फॉर मेडिकल प्रोफेशनल (Beyond Medicine: A to E for Medical Professionals)हे पुस्तक आज ऑनलाईन प्रकाशित झाले. या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचे http://www.parthlive.com यावर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, पुस्तकाचे लेखक कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. संदीप माने, डॉ. सुनील थितमे, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, सध्या देशभरात नाही तर जगभरात कोविड-19 मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या काळात आरोग्य यंत्रणा अविरत काम करून रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचविणाऱ्या डॉक्टरांना देव मानले जाते. आजच्या परिस्थितीत हेच डॉक्टर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी देवदूत ठरले आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, टेक्निशियन, लॅब असिस्टंट यांनी या काळात केलेले काम महत्त्वपूर्ण ठरले आहे.

चांगले आरोग्य आणि साक्षरता हे सुदृढ समाजाचे लक्षण असते. कारण चांगले आरोग्य आणि शिक्षण असेल तरच समाज आणि पर्यायाने राष्ट्र चांगले बनते. आज भारताने वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे चांगली प्रगती केली आहे हे दिसून आले आहे. आरोग्यदायी समाज आणि सामाजिक स्वास्थ्य मजबूत करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच महत्त्वाचे ठरेल असे श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

वैद्यकीय माहिती आणि कौशल्य यावर लक्ष देण्याबरोबरच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात अधिक चांगले संबंध कसे होतील यावर लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करताना विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांची आवड असते पण याचबरोबर वैद्यकीय शिक्षण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या कौशल्याने अंगीकारणे आवश्यक आहे, असे श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध समस्या येत असतात. याच विषयावर हे पुस्तक असून वैद्यकीय क्षेत्रातील विविध मार्गदर्शक तत्वे आणि दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवर आधारित उत्तरे कशी मिळवायची याची माहिती या पुस्तकातून मिळते. आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, विद्यार्थी, अभ्यासक ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते.

Exit mobile version