जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलदिन कार्यक्रम
पुणे : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे महसूल विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदु माणून काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुणवंत अधिकारी-कर्मचारी यांचा डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, विविध योजनांच्या अंमलबजावणीत गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या कामकाजावर प्रशासनाची प्रतिमा अवलंबून असते. प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महसूल विभागाची भूमिकाच कायम मदतीची राहीली आहे, त्यामुळेच सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. प्रशासनात केलेल्या सेवेबाबत आज ज्यांचा गौरव झाला, हाच दृष्टीकोन समोर ठेवत प्रत्येकाने सेवा करावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, प्रशासनात काम करताना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करताना सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवत सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करावे, प्रशासनात काम करताना निर्णयक्षमता महत्वाची असल्याचे सांगून गावपातळीपासून जिल्हापातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यानची सकारात्मक भूमिका महत्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले, आजचा पुरस्कार सोहळा हा प्रातिनिधीक स्वरूपाचा असून सर्वच अधिकारी व कर्मचारी हे चांगले काम करीत असल्याचे सांगून महसूल प्रशासनाने वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक चव्हाण, तलाठी संघटनेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. आभार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी मानले.यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.