संकटमोचक आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्व ही प्रणबदांची ओळख – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
Ekach Dheya
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा मांडला शोकप्रस्ताव
मुंबई : माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एका महान मुत्सद्दी नेत्याला गमावले आहे. प्रणबदा यांचा विविध विषयात सखोल अभ्यास होता. संकटमोचक असणारे प्रणबदा हे बहुआयामी व्यक्तिमत्च होते, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.
प्रणब मुखर्जींच्या कामाचा प्रभाव देशावर प्रदीर्घ काळ राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रणबदा यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून केलेले काम देशासाठी महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. मला सुध्दा त्यांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, प्रणबदांबद्दल मॅन फॉर ऑल सिझन असे म्हटले जाऊ शकते. देशाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील किमान 60 वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. इतिहासातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रणबदा यांचे नाव घ्यावे लागेल.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 15 पुस्तके लिहिणारे प्रणबदा हे उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखले जायचे. ते एक कुशल प्रशासक होतेच पण त्याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करुन आपल्या कामाची छाप सोडली.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, परराष्ट्र व्यवहार समिती प्रमुख, आंतरराष्ट्रीय नाणे निधीमधील त्यांचा सहभाग, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, प्रणबदांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले प्रणबदा यांची संकटमोचक अशी ओळख होती. कायदा आणि इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापकी आणि पत्रकारिताही केली. कुशल प्रशासक, उत्तम स्मरणशक्ती असलेल्या प्रणबदा यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक ठरले.