कोविडसह राज्यातल्या विविध समस्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आरोप
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तारूढ सदस्य जाणूनबुजून चर्चा टाळत असून, राज्यात पूर आला, कोकणात चक्रीवादळ आलं आणि कोविडनं लोक मरत आहेत मात्र सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान केला. चर्चा सुरु करायला वेळ झाल्यामुळे चर्चेची वेळ वाढवण्याची मागणीही त्यांनी केली.
जुलैपासून राज्यात कोविडचे नवे हॉटस्पॉट तयार झाले असून, सर्वत्र भयावह स्थिती असल्याचं सांगत सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेऊ शकत नाही तर सर्वसामान्यांचं काय होईल, असं ते म्हणाले.
कोविडमध्ये आपले राज्य पहिल्या क्रमांकावर असून, मुंबईतली सरकारनं जाहीर केलेली मृतांची आकडेवारी खोटी आहे असा आरोप करत, मृत्यू लपवून सरकार या रोगाचा मुकाबला कसा करणार असा सवाल त्यांनी केला. कोरोनासंदर्भात सरकारचे अनेक निर्णय चुकल्याचे तसंच सरकारचा खासगी रुग्णालयांवर कोणताही वचक राहिला नसल्याचं ते म्हणाले.
राज्यात कोरोना काळात शेतकऱ्यांना बोगस बियाणी मिळाली. सोयाबीनची पेरणी पूर्ण किडीमुळे वाया गेली. कापूस , उडीद , कडधान्य ही त्याच स्थितीत असताना सरकारनं त्याची दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.