नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘२१ व्या शतकातलं शालेय शिक्षण’ या विषयावर शिक्षण मंत्रालयानं घेतलेल्या ऑनलाईन परिषदेत ते आज बोलत होते. देशभरातून अनेक शिक्षक या परिषदेत सहभागी झाले आहेत.
तिसरी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला एका मिनिटांत किमान ३० ते ३५ शब्द सहज वाचता यावेत, प्राथमिक शाळेतल्या बालकांना बेरीज वजाबाकी सहज करता यावी, यासाठी नियमित अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. विद्यार्थ्यांची स्थानिक उद्योग पाहणीसाठी सहल काढावी, अशा उद्योजकांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून द्यावा, यातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा कुतुहल वाढीस लागेल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या सभोवती काम करणाऱ्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संवेदना जागृत करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
विद्यार्थ्यांना ज्या भाषेत सहज आकलन होईल, ती भाषा शिक्षणाचं माध्यम असायला हवी, किमान पाचव्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण देण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. गुणपत्रिकेला अत्यधिक महत्त्व देण्याऐवजी, विद्यार्थ्याच्या संपूर्ण विकासावर भर दिला पाहिजे, असं ते म्हणाले.
२०२२ पर्यंत देशातल्या प्रत्येक बालकाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शिक्षण मिळेल, यासाठी सर्व शिक्षक तसंच पालकांनी सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.