Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी समाज प्रबोधन पर्व

पिंपरी : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज प्रबोधन पर्व उपयुक्त असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.

अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, निगडी येथे दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०१९ दरम्यान  लोकशाहिर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित प्रबोधन पर्वाचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सदस्य मनोज तोरडमल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या कमल घोलप, सुमन पवळे, अनुराधा गोरखे, शैलजा मोरे, नितीन हिरवे, यांच्यासह अण्णाभाऊ साठे संयोजन समितीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

महापौर राहूल जाधव म्हणाले, समाजाच्या प्रगतीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मोठया प्रमाणात निधीसह विविध योजना जाहिर केल्या आहेत. समाजाने त्याचा लाभ घेऊन समाज प्रगती साधली पाहिजे. शासनाने विविध नोकर भरत्या जाहिर केल्या असून समाजाने त्यात सहभाग घेऊन यश संपादन करावे, त्यातुनच समाजाची प्रगती होणार आहे. समाजाचे दैवत अण्णाभाऊ असून त्यांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी. नेहमीच सकारात्कम विचार करुन मार्गक्रमण केल्यास यश हमखास मिळते. अण्णाभाऊंच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्याचा मान मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी अमित गोरखे म्हणाले, साडेचार वर्ष बंद असलेले महामंडळ चालू झाले त्याचे प्रतिनिधित्व मी व मनोज तोरडमल करत आहे. या महामंडळाच्या वतीने मोफत मार्गदर्शन शिबीर, महिला रोजगार थेट कर्ज योजना महाराष्ट्रभर पोहोचविले जाईल, उद्योगधंदयासाठी योजना महामंडळाच्या वतीने राबविले जाईल. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. तसेच त्यांच्यावर सिनेमा काढला जाईल. समाजाचे अवघड प्रश्न शासनमार्फत सोडविले जातील. मुंबई विद्यापिठास अण्णाभाऊ साठेंचे नाव दिले जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. दुसरे तुकाराम अण्णा असून शाहिरी व पोवाडयाने त्यांनी प्रबोधन केले आहे. बँड पथकाने त्यांचे पथक रजिस्टर करुन घ्यावे. त्यांना वाद्यांसाठी महामंडळामार्फत कर्ज दिले जाईल. एमपीएससी व युपीएससी सेंटर व्हावे, याव्दारे चांगले अधिकारी समजातून निर्माण होतील. असे ते म्हाणाले.

दरम्यान सकाळ सत्रात विठ्ठल कांबळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, चंदन कांबळे आणि संच यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात आला. दुपार सत्रात भव्य बँड स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाल्या. सायंकाळच्या सत्रात साजन बेंद्रे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, नगरसदस्य दत्ता साने, नगरसदस्या सुमन पवळे आदि मान्यवरांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवाद केले.

Exit mobile version