Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गोरेगावमध्ये अत्याधुनिक आयसीयु कोविड सेंटरचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरात २२४ खाटांचे सुसज्ज असे आयसीयु, एचडीयु कोविड रुग्णालय उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोविड रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे या केंद्रात सुविधा मिळतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असे आयसीयु, एचडीयु, डायलिसीस रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या कोविडसेंटरमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, विविध प्रकारचे व्हेंटिलेटर, प्रत्येक बेडसोबत मल्टी पॅरा मॉनिटरची सुविधा देण्यात आली आहे. सर्व बेड्स सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टमला जोडलेले आहे.

नेस्को सेंटरमध्ये उभारलेल्या नव्या केंद्रामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडस्, आयसीयु बेड्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्यावतीने या केंद्राला सर्व सहकार्य केले जाईल, असे श्री. देसाई म्हणाले.

या केंद्राच्या प्रमुख डॉ. निलीमा आंद्रादे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version