‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Ekach Dheya
पुणे : कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिक या सर्वांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, तहसीलदार निवास ढाणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, या मोहिमेत सर्व नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून संशयितांची कोविड-19 चाचणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे उद्दिष्ट कोविड-19 बाबत प्रत्येक नागरिकांना शिक्षित करणे तसेच संशयित नागरिकांना तात्काळ शोधणे व त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे आहे, जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल.
कोरोना प्रतिबंधासाठी व्यक्ती व कुटुंब केंद्रबिंदू मानून नागरिकांनी आपापसात अंतर राखावे. तसेच फेसमास्कचा वापर करावा आणि वारंवार हात धुवावा, या त्रिसूत्री चा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे आहे. शिवाय दुकाने, कार्यालये व आवश्यक कामानिमित्त समाजात वावरताना दक्षता घ्यावी, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ चे पालन करुन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला केल्या.