भारत चीन वादावर संरक्षण मंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निवेदनाला महत्त्व आलं आहे.
आज लोकसभेत, संसद सदस्याचे वेतन, भत्ता आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक, अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक आणि बँक नियंत्रण दुरुस्ती अशी तीन विधेयकं सादर केली जाणार आहेत. तर राज्यसभेत, दिवाळखोरीबाबतचं दुरुस्ती विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी राज्यांना बळ मिळावं, यासाठी केंद्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीचा 11 हजार 92 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 3 एप्रिलला दिला असल्याचं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत सांगितलं.
नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून राज्याच्या एकूण उत्पादनाच्या 2 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त खरेदी करण्याची परवानगीही राज्यांना दिली असल्याचं ठाकूर यांनी लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.