कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात उमटले तीव्र पडसाद
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं, यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं काल याबाबतअधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी आंदोलनं सुरू केली आहेत. देवळा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन, सटाणा इथं चक्काजाम आंदोलन केलं. आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करुन अन्य राज्यात पाठवू नये असं आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केलं आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणी खासदार भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पिंपळगाव बाजारसमितीमधे कांदा लिलाव सुरळित सुरू आहेत, तर जिल्ह्यातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली असून, संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडले आहेत.