Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बलशाली भारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे – अण्णा हजारे

पिंपरी :  बलशाली भारताच्या निर्मितीसाठी देशातील प्रत्येक युवक युवतीने एकेक गावाची निवड करून ग्राम विकासात योगदान द्यावे, युवाशक्ती ही खरी राष्ट्र शक्ती असून युवकांनी स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवून कार्यप्रवण होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे विश्वबंधूत्व दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदानी भारताचे प्रतिनिधी म्हणून केलेल्या स्मरणीय भाषणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून म्हणून जगभर साजरा केला जातो. यावेळी बोलताना अण्णा हजारे पुढे म्हणाले कि त्यांनी समाजसेवेच्या कार्यात स्वतःला  झोकून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचारच मार्गदर्शक ठरले. वयाच्या पंचविसाव्या वर्षांपासून सुरु केलेल्या या कार्याचा निर्धार आत्ता वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा  तितकाच पक्का आहे असे सांगत त्यांनी त्यांचे सामाजिक कार्यातील विविध अनुभव सांगत युवकांनी स्वतःच्या आचरणाने राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात, इंटरनेट, मोबाईल, स्वतःचे धावपळीचे झालेले वैयक्तिक  आयुष्य या सगळ्यांना सामोरे जातानाच थोडेफार का होईना आपला खारीचा वाटा प्रत्येकाने सामाजिक कार्यात दिल्यास निश्चितच आपला देश जगाला मार्गदर्शक ठरेल व तोच खरा शाश्वत विकास ठरेल. आपण राळेगण सिद्धी हे गाव निवडून जसे सामाजिक कार्य सुरु केले त्याप्रमाणेच युवकांनी ते ज्या गावात राहत असतील त्याच गावात, त्याच वस्तीत जमेल तितक्या सामाजिक कार्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही यावेळी अण्णा हजारे यांनी सुचविले.

यावेळी केंद्र संचालिका श्रीमती अरुणाताई मराठे यांनी विवेकानंद केंद्राविषयी माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद केंद्राचे उत्सव प्रमुख पवन शर्मा यांनी केले, तर प्रार्थनागीत पूजा ताई कुलकर्णी यांनी व ‘वसुंधरा परिवार हमारा’ हे गीत सुप्रिया ताई लातूरकर यांनी गायले, तसेच जगजीत कुलकर्णी यांनी विवेकानंद वाणीतून विवेकानंदांचे विचार मांडले, कार्यक्रमाचे संकलन व ऑनलाईन प्रसारण विवेक डोबा यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयदेव म्हमाणे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विवेकानंद केंद्र नगरप्रमुख पुंडलिक मते, युवा प्रमुख राहुल भालेकर, बालाजी दादा,अविनाश दादा गोखले व अस्मिताताई यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version