केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान – पणनमंत्री बाळासाहेब पाटील
Ekach Dheya
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्येसुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
खासदार शरद पवार यांनीसुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीसंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. लिलाव थांबले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवावी अशी विनंती करण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले.