Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा उपक्रम

मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने प्रज्वला उपक्रमाच्या माध्यमातून या महिलांसाठी सायबर सुरक्षेविषयी राज्यभर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे नुकत्याच या कार्यशाळा झाल्या आहेत.

राज्य महिला आयोगामार्फत प्रज्वला उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये कायदा व अर्थविषयक जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सायबरच्या माध्यमातून सायबर सुरक्षा या विषयावर राज्यभर या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

इंटरनेटमुळे समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. त्यातून अनेकदा समाजाच्या सांस्कृतिक व सार्वजनिक जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यातून सायबर गुन्हे घडत आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत महिला आयोग व महाराष्ट्र सायबरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बचत गटाच्या महिलांसाठी जनजागृतीविषयक कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यासाठी महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

यासंबंधी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर म्हणाल्या, ऑनलाईन जगात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांनी हाती घेतलेली सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम सर्वच स्तरांतील महिलांना अत्यंत फायद्याची ठरणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आयोगामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून महिलांना डिजिटल युगात सुरक्षितपणे राहता येईल.

इंटरनेटचा सुरु असलेला अमर्यादित वापर आणि प्रचंड संख्येने वाढत असलेले स्मार्ट फोनचे वापरकर्ते या परिस्थितीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर कायद्यांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल जनजागृती अत्यंत महत्त्वाची ठरते. सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठीच्या विविध पद्धती आणि सायबरविषयक कायदे जाणून घेणे महत्त्वाचे असून इतरांनाही त्याबद्दल माहिती देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठीच राज्य महिला आयोगाचे विविध अधिकारी, महाराष्ट्र सायबरचे अधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यामधील विविध संस्था एकत्र येणार आहेत. सायबर गुन्हे हा सामाजिक सलोखा आणि सुरक्षेपुढे निर्माण झालेले आव्हान असून ते पेलण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केले.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत म्हणाले, प्रज्वला योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील. आर्थिक सक्षम झालेल्या महिलांना आर्थिक गोष्टींची सुरक्षा राखण्यासाठी तसेच डिजिटल युगात इंटरनेटचा योग्य वापर करण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या कार्यक्रमाची मदत होणार आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन

‘प्रज्वला’ योजनेअंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे महिलांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेत रत्नागिरी सायबर युनिटच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी तर सिंधुदुर्गमध्ये सायबर युनिटच्या सहपोलीस निरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले.

फोटोमध्ये छेडछाड करून दुरूपयोग, चित्रफित, फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक यांसारखे वाढत असलेले प्रकार टाळण्यासाठी महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी रत्नागिरी येथे केले.

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील म्हणाल्या फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये अथवा स्वीकारू नये, सोशल मीडिया वापरताना त्यात असलेल्या प्रायव्हसी सेटिंग्सबद्दल जाणून घेऊन त्याचा योग्य वापर करावा. संपर्क, पत्ता तसेच इतर वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अपलोड करणे टाळावे आणि व्हॉट्सॲपवर डीपी, स्टेटस ठेवताना काळजी घ्यावी.

फिशिंग आणि विशिंग या दोन वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपला पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला ईमेल उघडू नका आणि प्रलोभनांच्या ईमेलना बळी पडू नका, असा सल्ला सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात श्रीमती कुलकर्णी यांनी दिला.

सायबर स्पेसमध्ये आपल्या नागरिकांचे, व्यावसायिक संस्थांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर नेहमीच तत्पर असेल आणि त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करेल. राज्यात असे जनजागृतीचे अनेक कार्यक्रम यापुढेही होत राहतील, असे पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे यांनी सांगितले.

Exit mobile version