Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी

मुंबई : मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’  योजनेची प्रभावीपणेअंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.

श्री. पगारे म्हणाले, वन नेशन वन रेशनकार्ड  योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस’  साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे कशा प्रकारे धान्य वाटप करण्यात येते, या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात,  हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, लेह लडाख, लक्षद्वीप व दीव दमण, जम्मू काश्मीर, मणीपूर, नागालँड, उत्तराखंड अशा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकांधारकांना देय असलेले अन्नधान्य  पोर्टेबिलिटीद्वारे प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकांधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन द्यावे.

Exit mobile version