राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस – ठिकठिकाणच्या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी-नामदेव, कहाकर-बुद्रुक परिसरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड जिल्ह्य़ाच्या धर्माबाद तालुक्यात बन्नाळी परिसरात मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली तर काही ठिकाणी शेतजमीन खरडून वाहून गेली आहे. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, मिर्ची तसंच फळबागांच मोठ नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात जालना, बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका आणि दुधना या नद्यांना मोठा पूर आला आहे. पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी पिकात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी ऊस आणि मका पीक आडवे झाले आहे.
बीड जिल्ह्यात धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातले मोठे प्रकल्प, तसंच मध्यम परंतु बीड शहरास पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. माजलगाव धरणात सध्या ७ हजार ८४८ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. पैठण इथला जायकवाडी प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्याव्दारे ४०० क्युसेकने पाणी माजलगाव धरणात येत आहे. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यात पसरलेल्या मांजरा धरणातल्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणातला विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या तीन हजार ३९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या सांडव्यातून दोन हजार ९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असून उजव्या कालव्यातून ६००, आणि डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
सातारा आणि धुळे जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.