चीननं करारांचं उल्लंघन करुन सीमेवर सैन्य जमवलं असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन सीमेवरील स्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये १९९३ आणि ९६ साली महत्वाचे करार झाले आहेत, मात्र चीनकडून या कराराचं उल्लंघन झालं आहे. चीननं तिथं मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे. या आव्हानात्मक स्थितीला भारताकडून चोख प्रतुत्तर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
चीन सीमेवरील स्थितीबाबत त्यांनी आज राज्यसभेत सविस्तर निवेदन केलं. ते म्हणाले की दोन्ही देशातील सीमांविषयी दोन्ही देशांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. मात्र प्रत्यक्ष ताबा रेषेचा दोन्ही देशांनी सन्मान राखावा असे ठरले असताना चीनकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही.
लडाखच्या पेंगाँग भागात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडल्याचं सिंग यांनी नमूद केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला जर कितीही कठोर भूमिका घ्यावी लागली तर आम्ही बिलकुल मागं हटणार नाही अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली.