Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 1 हजार 977 तर नगरपालिका क्षेत्रासाठी 1 हजार 203 पथकांची स्थापना
ग्रामपंचायत क्षेत्रात 3 लाख 51 हजार 513 तर नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी पूर्ण

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वपूर्ण असून पुणे जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 1 हजार 977 तर नगरपालिका क्षेत्रासाठी 1 हजार 203 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात 3 लाख 51 हजार 513 तर नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

जिल्हयातील 46 ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 106 झोनल व 1 हजार 977 सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2020 दरम्यान एकूण 3 लाख 51 हजार 513 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्हयात एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 4 हजार 767 संशयित रुग्ण असून 4 हजार 602 नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 674 नागरिक बाधित तर 3 हजार 801 नागरिक निगेटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी 577 रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. 106 रुग्ण गृह अलगिकरणामध्ये आहेत. निगेटीव्ह असणाऱ्यांपैकी 2 हजार 542 नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.

जिल्हयातील इंदापूर, जुन्नर, मावळ, शिरुर व बारामती या नगरपालिकांसाठी 47 झोनल व 1 हजार 203 सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2020 दरम्यान एकूण 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 973 संशयित रुग्ण असून यापैकी 931 नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 149 नागरिक बाधित तर 782 नागरिक निगेटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी 72 रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून 67 रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. निगेटीव्ह असणाऱ्यांपैकी 418 नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्याने या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार केले जाणार आहेत. लोकसहभागातून ही मोहिम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version