मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
Ekach Dheya
पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती, कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलीटी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्ण कल्याण नियामक समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस, स्थानिक मनोविकार तज्ञ डॉ. भरत सरोदे, शर्मिला सय्यद आणि इतर सदस्य उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, ज्या रुग्णांना बरे झाल्यानंतरही त्यांचे नातेवाईक घेवून जात नाहीत किंवा बरे झालेले तथापि, त्यांचा मूळ ठावठिकाणा सापडत नसलेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. याकरिता स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या रुग्णांना कोरोनाची लागण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, आवश्यकता वाटल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र 2 वॉर्ड निर्माण करण्यात यावेत, असेही ते म्हणाले.
मनोरुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करतांना त्यांचे नातेवाईक जवळ असतील, तर असे रुग्ण लवकर बरे होण्याची शक्यता असते. या बाबीचा विचार करुन फॅमिली वॉर्ड विकसित करता येतील, का याचाही विचार करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केली. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी प्रास्ताविक केले.