शहापूर तालुक्यातील नामपाडा व गारगाई प्रकल्पांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत
Ekach Dheya
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या नामपाडा लघुपाटबंधारे व गारगाई प्रकल्पांच्या अडीअडचणींसंदर्भात तातडीने कार्यवाही करुन हे प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
यासंदर्भातील बैठक मंत्रालय येथे झाली. यावेळी आमदार दौलत दरोडा तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई महानगर पालिकेचे मुख्य अभियंता शिरीष उजगावकर व इतर संबधित अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रिय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले.
या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता 2004 ची आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, तसेच त्याठिकाणी इतर अनुषंगिक कामे अधिक गतीने होणे यासाठी असलेल्या अडीअडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
गारगाई प्रकल्प मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. त्याठिकाणी पुनर्वसनासाठी वनविभाग तसेच अन्य पर्यायी जागा, रेडीरेकनरप्रमाणे दर, संबंधित ग्रामस्थांसाठी शेती व पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवणे व इतर सोयी-सुविधा याबाबत आमदार दौलत दरोडा यांनी तेथील ग्रामस्थांचे प्रश्न बैठकीत मांडले व त्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय घ्यावेत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
यावेळी दोन्ही गावचे ग्रामस्थ, सरपंच, पालघर जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी व मंत्रालयातील विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.