Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे उपराष्ट्रपतींचे वन अधिकाऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज व्हावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. 2018 च्या भारतीय वन सेवेतल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी ते संवाद साधत होते. वन अधिकाऱ्यांची पारंपारिक भूमिका झपाट्याने बदलत असून त्यांना वनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याबरोबरच वनांवर अवलंबून असलेल्या जनतेला या संदर्भात शिक्षित करायचे कामही करावे लागणार आहे.

हवामान बदल आणि जैव विविधतेचे होणारे नुकसान यांची दखल घेऊन त्यावर मात करण्यामधे भारताने जगात आघाडीची भूमिका बजावावी आणि इतर राष्ट्रांनी अनुकरण करण्यासाठी आदर्श निर्माण करावा असे उपराष्ट्रपती म्हणाले.

वन संवर्धन आणि संरक्षण यासंदर्भात जनतेला शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या काळात वन आच्छादन वृद्धिंगत करण्यासाठी कमी वाव आहे हे लक्षात घेऊन वनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वन अधिकारी म्हणजे वनांचे संरक्षक आहेत असे सांगून राष्ट्रीय वन धोरणाची अंमलबजावणी करुन जैव विविधतेचे स्थैर्य राखणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. विकास आणि पर्यावरण जतन यांचा समतोल राखण्यात वन अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावावी. भारतासारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या राष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी हा समतोल आवश्यक असल्याचेही उपराष्ट्रपती म्हणाले.

Exit mobile version