Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून कोसळत आहे. अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरु आहे. मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल दुपार पासून झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

जळगाव जिल्ह्यातल्या गिरणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिरणा नदीची पाणी पातळी वाढत आहे. नदीपात्रात गिरणा धरणांमधून ५९ हजार ४२५ क्युसेक पाणी सोडण्यात आलं. गिरणा धरण परिसरातल्या नागरिकांनी  नदीपात्रामध्ये गुरंढोरं सोडू नये तसंच नदी पात्रामध्ये जाऊ नये, असं आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी केलं आहे.

सांगली जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी भागात कालरात्री सलग 3 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यंदा पावसामुळे कोरडा नदीला तीस वर्षात प्रथमच मोठा पूर आला. या पुरामुळे सांगली जिल्ह्यातल्या जत आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातले ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. काल संध्याकाळी झालेल्या पावसानं ढगफुटीचा अनुभव लोकांना आला.

नांदेड शहराजवळच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचे ९ दरवाजे उघडण्यात आले असून एक लाख ११५ क्यूसेक गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. भोकर तालुक्यातल्या काही गाव शिवारात जाऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पिक नुकसानीची पाहणी केली.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सोयगाव देवी गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह आज पहाटेच्या सुमारास नाल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आले. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या दुधना नदीवरच्या निम्न दुधना प्रकल्पाचे  एक, दोन, १९ आणि २० क्रमांकाचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले.

यातून ७ हजार १९० क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून, पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल, असं प्रकल्प अभियंत्यांनी सांगितलं.

बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Exit mobile version