Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची अफगाणिस्तानच्या महावाणिज्य दूतांनी घेतली भेट

मुंबई :- भारत तसेच महाराष्ट्राशी अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध असून महिला व बालविकासाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीच्या संकल्पना, कौशल्य अफगाणिस्तानला पुरविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. परस्पर सहकार्याच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांची आज अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत श्रीमती झकिया वार्दक यांनी भेट घेतली.

महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाची अफगाणिस्तानमधील महिला मंत्रालयासोबत ऑनलाईन बैठक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन श्रीमती वार्दक म्हणाल्या, त्यामुळे राज्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरणाचे कार्यक्रम कशा पद्धतीने राबविले जात आहेत याची माहिती अफगाणिस्तानच्या मंत्रालयाला मिळू शकेल.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील महिला व बाल सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांची माहिती अफगाणिस्तानला या क्षेत्रातील धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. महिला सक्षमीकरणासाठी विचारांचे आदान प्रदान आवश्यक असून त्यासाठी लवकरच ऑनलाईन बैठक करण्यात यावी, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होत्या.

Exit mobile version