कोरोनाशी लढण्याबरोबरच विकास कामांना वेग देण्याचे प्रयत्न स्तुत्य
Ekach Dheya
ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाणेवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना विकास कामांचा वेगही हळूहळू वाढविणे स्तुत्य आहे असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कोरोनाच्या संकट काळात ठाणेवासियांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महापालिका करीत असलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. महापालिकेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या दिवसाला ६ हजारापर्यंत नेली आहे. अशा प्रयत्नांमुळेच ठाणे शहराचा मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे.
एकीकडे कोविडसोबत लढा देताना शहरातील विकासकामेदेखील हळूहळू सुरु करण्यात येत आहेत. यात कळवा येथील खाडीवरील उड्डाणपुल, खारेगाव येथील रेल्वेपुलाचे काम, ठाणे रेल्वेस्टेशन पूर्वेकडील सॅटीसचे काम आणि स्मार्ट सिटीअंतर्गत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट अशा महत्त्वाच्या विकासकामांचा उल्लेख करता येईल.
त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेमार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या शासनाच्या मोहिमेच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. ठाणेकरांच्या सहकार्यातून महापालिका ही मोहीम नक्कीच यशस्वी करेल, असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
या वर्धापनदिनानिमित्त महापौर, आयुक्त, पदाधिकारी, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.