Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु करायला परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ आँक्टोबरपर्यंत कायम ठेवला असला, तरी, मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यानुसार, हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु करायला परवानगी दिली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या पाच तारखेपासून आवश्यक खबरदारी घेत या सेवा सुरू करता येणार आहेत. त्यासाठीची प्रमाण कार्यपद्धत पर्यटन विभाग जारी करेल.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. याबरोबरच डबेवाल्यांना उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची मुभा दिली असून त्यांना मुंबई पोलिसांकडून क्यू आर कोड दिले जातील.

पुण्यातही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरु केली जाणार आहे.

महाराष्ट्रातच धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून तात्काळ सुरु केल्या जाणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सर्व औद्योगिक आणि उत्पादन कारखाने सुरु करायलाही परवानगी दिली आहे. ऑक्सीजन घेऊन जाणाऱ्या वाहनांची विनाअडथळा आणि विना निर्बंध वाहतूक सुरूच राहील याची जबाबदारी  स्थानिक प्रशासनानं घ्यावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.  प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, जलतरण तलाव, मनोरंजन उद्यानं यांच्यासह मेट्रो रेल्वे सेवाही ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहे.

Exit mobile version