हाथरस इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा – रामदास आठवले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात हाथरसच्या चांडपा गावात दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या मृत्यू प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
याप्रकरणी आज रिपब्लिकन पक्षानं मुंबईत अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर आंदोलन करून निवेदन दिलं. रिपब्लिकन पक्षाचे काकासाहेब खंबाळकर, प्रकाश जाधव, नवीन लादे, रतन स्वारे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
उद्या दुपारी हाथरस या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानावर रिपब्लिकन पक्ष आंदोलन करणार आहे. तर २ ऑक्टोबरला रामदास आठवले या प्रकरणातल्या पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत.
हाथरस इथं झालेल्या, सामूहिक बलात्कार प्रकणात बळी पडलेल्या १९ वर्षीय मुलीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार तातडीने उरकावेत म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारनं केलेली ही कृती दुर्देवी आणि अमानवीय आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.