नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी विधेयक लागू न करण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे, या निर्णयाचा निषेध करत, भाजपानं आज राज्यभर आंदोलन सुरु केलं.
भाजपाच्या औरंगाबाद शाखेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी केली. राज्यात या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज उस्मानाबाद इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केलं.
हा कायदा महाराष्ट्र लागू न करण्यासंदर्भात राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाची कार्यकर्त्यांनी होळी केली. भाजपा किसान मोर्चा, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंग पाळत राज्य शासनाविरोधात हे निदर्शन केलं.
लातूरमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी याच विषयावरुन आंदोलन छेडलं. केंद्रानं पारीत केलेलं विधेयक शेतकऱ्यांच्या जीवनांत अमूलाग्र बदल करणारं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल तिथे तो विकण्याचा त्यांना अधिकारी आहे, असं असून राज्य शासन ते लागू करत नाही, म्हणून हा निषेध असल्याचं भाजपा लातूर जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश यांनी सांगितलं.
सोलापूरच्या भाजपा कार्यकर्त्यांनी, या विधेयकला विरोध करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध केला आहे. भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी तशा आशयाचं निवेदन देण्यात आलं.