Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ७ तारखेला पूर्व-विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. परंतु ८ तारखेला विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत ८ आणि ९ ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ८ आणि ९ ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भात ९ ऑगस्टपासून तर मध्य-महाराष्ट्रात १० ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य होईल. या दरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहावे,असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version