‘पर्यटन पर्व’ उपक्रमाचा मंत्रालयात शुभारंभ
रजा प्रवास सवलत काळात शासकीय कर्मचाऱ्यांना एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये मिळणार सवलत
तारकर्ली येथे १५ ऑगस्टपासून ओपन एअर सिफेसींग उपहारगृह
भीमाशंकर येथे अत्याधुनिक सोयींनीयुक्त पर्यटक निवास
मुंबई : मुंबईकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीने ‘सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील’ सुरु केले आहे. थ्री डी ची पुढची आवृत्ती असलेली सेव्हन डी थिएटरची संकल्पना असून यात दर्शकांना लघुचित्रपटाचा सात डायमेन्शन्समध्ये (सेव्हन डी) आनंद घेता येणार आहे. मंत्रालय येथे एमटीडीसीच्या ‘सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील’ चा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हे मिनी थिएटर ऑन व्हील मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया, दादर चौपाटी, गिरगांव चौपाटी, जुहू चौपाटी, बँड स्टँड आदी ठिकाणी उपलब्ध असेल. पर्यटकांना किरकोळ शुल्क देऊन यावर विविध लघुपट, कार्टुन्स आदींचा सात डायमेन्शन्समध्ये (सेव्हन डी) आनंद घेता येईल.
मंत्रालय येथे मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा याप्रसंगी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल,एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सतीश सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
रजा प्रवास सवलत काळात शासकीय कर्मचाऱ्यांना एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये सवलत
कार्यालयाच्या परवानगीसह रजा प्रवास सवलत (LTC) घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना येत्या १ ऑक्टोबर, २०१९ पासून एमटीडीसीच्या रिसॉर्टस्मध्ये किमान ५ दिवसांच्या बुकींगवर २५ टक्केपर्यंत सवलत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री श्री. जयकुमार रावल यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, साधारण १६ लाख संख्या असलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र पहावा व त्यांच्यामार्फत महाराष्ट्राची पर्यटन वैशिष्ट्ये इतरांपर्यंत पोहोचावीत यासाठी त्यांच्या रजा प्रवास सवलतीच्या काळात एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये सवलत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्रालयातील एमटीडीसी रिसॉर्टस्च्या बुकींग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
तारकर्ली येथे ओपन एअर सिफेसींग उपहारगृह
एमटीडीसीद्वारे तारकर्ली (जि. सिंधुदुर्ग) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायविंग सेंटर चालविण्यात येत आहे. या सेंटरमधील उपहारगृह समुद्र किनारी असून ते गजिबो प्रकारचे ओपन एअर सिफेसींग उपहारगृह आहे. हे उपहारगृह १५ ऑगस्ट, २०१९ पासून सुरु करण्यात येत असून त्यामध्ये विविध माशांचे बारबेक्यू प्रकार पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी घोषणाही श्री. रावल यांनी यावेळी केली.
भीमाशंकर येथे अत्याधुनिक सोयींनी युक्त पर्यटक निवास
त्याबरोबरच एमटीडीसीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यान्विन यंत्रणेमार्फत ९ कोटी ७ लाख रुपये खर्च करुन भीमाशंकर येथे अत्याधुनिक सोयीयुक्त पर्यटक निवास उभारण्यात आले आहे. हे पर्यटक निवास पर्यटक तथा भाविकांसाठी येत्या १५ ऑगस्ट, २०१९ पासून सुरु करण्यात येत आहे, अशी घोषणाही श्री. रावल यांनी यावेळी केली.
याबरोबरच एमटीडीसीला आयएसओ ९००० मिळाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. महाबळेश्वर येथे अत्याधुनिक सुविधांयुक्त १६ कक्ष पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करीत आहोत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.