Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं. या वेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखेपाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य माध्यमातून उपस्थित होते.

तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राच्या भूमीला अभिवादन केलं. गरीब, दुर्बल यांचे दुःख दूर करणे हा विखे पाटील यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

राजकारणाचा वापर त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केला. हेच त्यांचे वेगळेपण होते, अशा शब्दात विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विखे पाटील यांची काही वाक्ये मराठीतून उद्धृत केली. विखे पाटील यांनी सहकाराची चळवळ समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे राबवली. सहकार चळवळ ही निष्पक्ष आहे, असा त्यांचा विश्वास होता.

अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारमध्ये असतानाही त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये सहकाराचा प्रभावी वापर केला. देशात ग्रामीण भागातील शिक्षणाचा गांभीर्याने विचार होत नव्हता, तेव्हा विखे पाटील यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून गावागावात

चैतन्य निर्माण केलं, असं मोदी म्हणाले. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याची कमतरता दूर करण्यावरही विखे पाटील यांनी लक्ष दिलं. त्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात विविध जलसिंचन योजना राबवण्यात आल्या.

19 लाख कुटुंबाना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात आल्यचं त्यांनी सांगितलं. शेतीला फायदेशीर उद्योग बनवण्यावर विखे पाटील यांचा भर होता. त्याद्वारे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आमचे सरकार देशात प्रथमच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतमालाला योग्य किंमत देण्यासह विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

शेतीत नवीन आणि जुन्या पद्धतींचा मेळ घातला पाहिजे; उसाची शेती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी फक्त साखर उत्पादन केले जात असे आता इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले

जात आहे, यामुळे तेल आयातीवर खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असंही पंतपप्रधानांनी नमूद केलं. विखे पाटील यांच्या चार पिढ्या समाजकारणात आहेत, खूप चांगलं काम ते करत आहेत, अशी उदाहरण खूप कमी आहेत असंही मोदी म्हणाले.

कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे, महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांणी काळजी घ्यावी. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता बाळगणे याबाबत दक्ष राहावे, जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

Exit mobile version