नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात देशातील ७४ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार सुरु असलेल्या रुग्णाचं प्रमाण बरे झालेल्या रुग्णांच्या प्रमाणापेक्षा फक्त ११ पूर्णांक ४२ शतांश टक्के आहे. गेल्या २४ तासात देशात ६३ हजार पाचशे ९ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे सध्या देशाच्या विविध भागात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासात ७३० रुग्णांचा कोविड – १९ मुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातील या आजारामुळे झालेल्या एकंदर मृत्यूंची संख्या १ लाख १० हजार ५८६ झाली आहे. सध्या हा मृत्यूदर १ पूर्णांक ५३ शतांश टक्के असून तो जगभरातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.
केंद्र सरकारच्या तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी उपयोग केला जात असल्यानं भारताला हा टप्पा गाठणं शक्य झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.