Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘खेलो इंडिया’अंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी (केआयएससीईएस) आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, चंदिगड, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मिर यांचा समावेश आहे.

सरकारच्या या निर्णयाविषयी माहिती देताना केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू म्हणाले, तळागाळापर्यंत पायाभूत सुविधा विकसित करणे आणि खेळामध्ये उत्कृष्टता येण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीने सरकार एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर काम करीत आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देवून देशामध्ये असलेल्या सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंच्या प्रतिभेला वाव देण्यात येत आहे. तसेच ऑलिम्पिक क्रीडास्पर्धामध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी करावी, असे स्वप्न असून, त्याच्यापूर्तीसाठी क्रीडापटूंना सर्वतोपरी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या केंद्रांनी यापूर्वी केलेली कामगिरी, तिथे असलेल्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता, राज्यामध्ये असलेली क्रीडा संस्कृती, व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा विचार करून या राज्यांमधल्या एकूण 14 क्रीडा प्रशिक्षण केंद्राची श्रेणी सुधारण्यासाठी मंत्रालयाने चिह्नित केली आहेत. आता देशातल्या 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण 24 ‘केआयएससीईएस‘ची श्रेणी सुधारण्यात येणार आहे. या केंद्रांना आवश्यक असणारे क्रीडा साहित्य-उपकरणे, उच्च क्षमता असलेले व्यवस्थापक, प्रशिक्षक,  क्रीडा संशोधक, तांत्रिक मदत दिली जाणार आहे. तसेच या केंद्रांमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे.

प्रत्येक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये क्रीडा सुविधा तयार करण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा तसेच त्या देवू शकणारी संस्था किंवा ज्याठिकाणी जागतिक स्तरावरच्या क्रीडा सुविधा विकसित करणे शक्य आहे, अशा संस्था चिह्नित करण्यास सांगण्यात आले होते.

नव्याने केआयएससीईएसमध्ये पुढील केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

1.         आंध्र प्रदेश- डॉ. वायएसआर स्पोर्टस्  स्कूल, वायएसआर, जिल्हा-कडापा

2.         चंदिगड- हॉकी स्टेडियम, सेक्टर-42

3.         छत्तीसगड- राज्य खेल प्रशिक्षण केंद्र, बिलासपूर

4.         गोवा- एसएजी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, कॅमपाल, पणजी

5.         हरियाणा- मोतिलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्टस्, राय, सोनिपत

6.         हिमाचल प्रदेश- इनडोअर स्टेडियम लुहनू स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, बिलासपूर

7.         पुडुचेरी- राजीव गांधी स्कूल ऑफ स्पोर्टस, उप्पाल्लम

8.         त्रिपुरा- दशरथ देव स्टेट स्पोर्टस कॉम्प्लेक्स, बधरघाट, अगरतळा

जम्मे आणि काश्मिर –

1.         एम.ए. स्टेडियम फेन्सिंग अकॅडमी, जम्मू

2.         जे अँड के स्पोर्टस्  कौन्सिल वॉटर स्पोर्टस् अकॅडमी, श्रीनगर

सध्या ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केआयएससीईएसचे कार्य चालू आहे, त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

राज्ये – आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, सिक्किम, कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, चंदिगड, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा.

केंद्रशासित प्रदेश- दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मिर.

Exit mobile version