नवी दिल्ली : देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते आज समाजमाध्यमांवरून ‘सन्डे संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. सध्या दररोज सुमारे ६ हजार ४०० टन इतकी ऑक्सिजन उत्पादन क्षमता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भविष्यात ऑक्सिजनची मागणी वाढली तर, त्यानुसार उत्पादनात वाढ करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरातल्या ऑक्सिजनच्या गरजेसंदर्भात देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एका सक्षम गटाची स्थापना केली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मदतीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एकूण ३३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक हजार ३५२ कोटी रुपांचा निधी वितरित केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.