मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे, तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा इरिगेशन संचाचं नुकसान झालं आहे, या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, पंचनामे न करता तत्काळ दिलासा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज हवी असं फडणवीस यांनी नमूद केलं.
दरम्यान, फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यात बेगडा इथं नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुळजापूर तालुक्यात अपसिंगा इथं अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची तसंच काक्रंबा इथं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत पिकांची पाहणी केली, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, सरकारला मदत करायला भाग पाडू असं आश्वासन दिलं.
फडणवीस आज लातूर, बीड तसंच परभणी जिल्ह्यातही अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचून पाहणी करावी, असं, खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ते आज बीड जिल्ह्यात सावरगाव इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून, त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे.
केंद्र तसंच राज्य सरकारनंही राजकारणाच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, रबी पिकासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या तुंगी या गावीही नुकसानीची पाहणी केली. दापेगाव साठवण तलावाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं उभ्या पिकांचं नुकसान झाल्याबाबत त्यांनी तहसीलदारांना संपर्क साधून पंचनामा करण्यास सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत एकूण ४ लाख ७१ हजार ८१२ हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सुमारे ७ लाख १९ हजार ३५१ शेतकऱ्यांना या नुकसानाचा फटका बसला आहे.
पीक नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ३२१ कोटी रूपयांची मागणी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयानं शासनाकडे केली आहे. जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी आज ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. तुळजापूर तालुक्यात काटगाव, अपसिंगा, इथल्या पडझड झालेल्या घरांची तसंच शेतपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.